Friday, October 7, 2011

चि. निनाद ह्याला मुंजीची भेट

चि. निनाद यास,
अनेक उत्तम आशीर्वाद,

निनाद! मुंजीचे प्रेझेंट म्हणून तुला हे पुस्तक देत आहे ते तुला खूप आवडेल असे वाटते. कारण सांगू का? तुझ्या अमिता आणि अमला मावशीने चक्क तुझे व तुझ्या मित्रांचे नांवच गोष्टीत घातली आहे. (छापून घेतले आहे). वाचून बघ बघू. झाला न आनंद. तुझ्या मित्रांनापण वाचून दाखव. ही आगळी भेट पाहून ते पण खूष होतील.

निनाद! मला मात्र असे वाटते, तू एवढे मोठ्ठे व्हावेस की तुझे नांव पुस्तकांत आले पाहिजे. म्हणजे बघ तुझा लाडका निल आर्मस्ट्रांग सारखे. आहे की नाही त्याचे नांव तुझ्या शाळेच्या पुस्तकांत. तू जयंत नारळीकर सारखा हो. आपले राष्ट्रपति अब्दुल कलाम सारखा बन. तू नेकमी "छत्रपति शिवाजी महाराज की जय" म्हणतोस, तर शिवबा सारखा होण्याचा प्रयत्न कर. तुला गोष्टी आवडतात तर गोष्टी लिही, कविता आवडतात तर कविता रच, कुसुमाग्रजां सारखा हो. तुला क्रिकेट आवडते तर सचिन सारखा खेळ. तुला जे होणे आवडेल ते तू हो. पण सर्वश्रेष्ठ हो.

एक गोष्ट लक्षांत ठेव की मोठ होण्यासाठी खूप प्रयत्न करायचे, चिकाटी ठेवायची, पण टेन्शन घ्यायचे नाही. निराशतर अजिबात व्हावयाचे नाही. त्यासाठी आपले शरीर पण धष्ट-पुष्ट असले पाहिजे. म्हणून रोज सुर्यनमस्कार घाल. जेवताना हट्ट करावयाचा नाही. सर्व नीट जेवायचे. सचिनच्या अंगात ताकद आहे म्हणून तो छान फ़टके मासतो, हो की नाही?

हे पुस्तक तू कायम जपून ठेव कारण तू खूप मोठा होणार आहेस, तुझे नांव सर्वत्र होणार आहे. हे पुस्तक म्हणजे त्याची सुरवात आहे व आमचे आशीर्वाद आहेत.

मला माहिती आहे की तू हे पत्र आईकडून वाचून घेतले आहेस. काही हरकत नाही. तू आत्ता पासून लिहण्यास सुरवात कर "मी मोठा बनण्याचा प्रयत्न करणार आहे." असे प्रॉमिस देणारे पत्र मला लिही इंग्रजीत लिहलेस तरी चालेल पण मोठा झालावर मात्र मराठीतच लिही ’हे’.

चि. सौ. वैशालीस व चि. श्री. शंदेश यांस अनेक आशिर्वाद.

तुझ्या आजी व आजोबांना नमस्कार.
तुझी मामी आजी
सुषमा.

- सौ. सुषमा म. खरे
०७.०५.२००३

No comments:

Post a Comment