Monday, October 10, 2011

चि. अहनासाठी हत्ती चे गाणे

हत्ती रे हत्ती तुझा रंग काळा काळा
अगडबंब तू, तुझा खाऊ झाड पाला ॥

सुपा येवढे कान, तुझे पिटूकले डोळे
लांब जाडी सोंड तुझी मोठाले सुळे ॥

चार पायवर तू डूलत्डूलत चाले
छोटीशी शेपूट तुझी हळू हळू हाले ॥

- सौ. सुषमा म. खरे

१४.०३.११

Saturday, October 8, 2011

नातीला (अहना) झोपवताना सुचलेली आंगाईगीत

येग तूग गाई वासराच्या आई
तान्हा बाळाने दंगाई मांडीयली

आमची अहना राणी खूपखूप शहाणी
तिला द्या हो सोन्याची नाणी

आमची अहना आहे फार द्वाश
तुला द्या हो लाडू गोड गोड

आमच्या अहना चे करा लाड लाड
तिला द्या हो आंब्याची फोड

अमची अहना आहे मोठ्ठी लाडोबा
तिला द्या हो आख्खा मोठा आंबा
तिला द्या हो आख्खा मोठ्ठा आंबा

आमची अहना आहे फार हुशार
तिला आणा हो मीनी कॉमप्युटर

आमची अहना आहे गोंडूस गोंडूस
तिला आणा हो बाहूली फंडूस फंडूस

आमची आहना आहे मोठी धीट
तिला लावाहो छानशी तीट

ये ग लपिला गाय, ये ग कपिला गाय
माझ्या बाळाला दूध दे, अमृतमय, अमृतमय ।

दूध पिऊन, दूध पिऊन
माझी अहना होईल, धष्ट पुष्ट छान ।

येग मनी माऊ, ’मॉव मॉव करी’
माझा नानुशी तू खेळ क्षणभरी ।

येग चिऊ ताई, ’चिव चिव करी’
माझ्या चिमुकलीला गा ग अंगाई ।

येरे काऊ दादा, येरे काऊ दादा
माझा सोनुलीला ’झोका दे रे आता’ ।

येग मैना राणी, येग मैना राणी
अहना राणी साठी, तू ’गा ग गोड गाणी’ ।

येरे राघु दादा, ’विठू विठू करी’
माझा छकुलीला झोपेतं हसू येते भरी ।

येरे भू भू दादा, येरे भूभू दादा
कोणाला ही आवाज करून देऊ नको आता ।

माझ्या गोंडूसचा पाळणा हलवा हलवा
माझ्या गोंडूसचा पाळणा हलवा हलवा
वा~याच्या झुळुकेने ’येईल गारवा गारवा’
वा~याच्या झुळुकेने ’येईल गारवा गारवा’ ।

माझी गोंडूस, माझी छकुली, माझी सोनुली
झोप घेई आता ’शांत शांत’
झोप घेई आता ’शांत शांत’ ।

- सौ. सुषमा म. खरे

सविता रायकर (मैत्रीण) हिच्या निवृत्ती आणि वाढदिवस

विता म्हणजे सूर्य (रवी) अविरत काम करणारी

वितंडवादाचा विलक्षण तिटकारा असणारी

तापहिन मार्तण्ड अशीच भासणारी

रा धरता सर्वांवर लोभ करणारी

सर्वांस लाभों म्हणून शुभेच्छा देणारी

र्मण्येवाधिकारस्ते म्हणून गीता जगणारी

मू दे शांततेने आरोग्यपूर्ण पुढील जीवनी.

- सौ. सुषमा म. खरे

१३.०४.२००९

एम. डी. कुलकर्णी सर (प्रिन्सिपॉल)

P.S. High School (धर्मप्रकाश श्रीनिवास सय्या हायस्कूल) त्यांचा सत्कार शाळेच्या माजी विद्दार्थानी २००८ ला केला.

एम. - एम असे हा ज्ञानदानाचा
डी. - डीम डीमा नसे त्या गोष्टीचा

कु - कुसुमा* परी कोमल हा मनाचा
ल - लष्करी शिस्त परी आवडीचा
क - कर्तव्य दक्ष ह्या गुरूचा
र्णी - कर्णी निनादो जयजयकार त्याचा

* कुसुम कोमल असे मनाचा.

- सौ. सुषमा म. खरे

चि. इलाचा एक वर्षाचा वाढदिवस

इला तू सर्वंची सोनुली ग ।
लाडकी तू परि राणी ग ॥

दूटुकली टोपी तुझा मुगुट ग ।
लाल फ्राकमधे तुझी ऎट ग ।

इवल्याश्या जिवणीत लोभस इंसू ग ।
लाख मोलाचे आम्हास वाटते ग ॥

इला तुला सुला वरदान देवबाप्पाचे ग ।
लाभू दे तुला सुदृढ दीर्घायु ग ॥

- सौ. सुषमा म. खरे
०२.०८.०६

संसार संसार म्हणजे काय असते...

संपणे मिटणे उठणे असते

सांडणे लवंडणे उठणे असते

गडणे खळणे मिसळणे असते

संसार संसार म्हणजे काय असते

संकटे हरणे जिंकणे असते

सांगणे बोलणे ऎकणे असते

डणे भेकणे हसणे असते.

- सौ. सुषमा म. खरे

अंगाईगीत - चि. इला बारसे.

चाल: चंदा राजा येये

गाई गाई येये, गाई राणी ये।
रातराणीच्या गंधाला
मंदमधुर नादाला
संगे घेऊन ये इथे। ।
गाई राणी ये... गाई गाई ये ये....

प्राजक्ताच्या पानातून
हळूवार ss झुळकेनी
झुला झुलवाया ये ss ॥ गाई राणी ये...

शितलश्या चांदण्यातून
पाखरांच्या गाण्यांनी
अंगाई गाण्या ये ss ॥ गाई राणी ये...

गोड गोड स्वप्नातून
फुटे हसु ओठावर
पापा घ्यावया ये ss ॥ गाई राणी ये...

इवल्याश्या पापण्याला
इळकेच झाकण्याला
हळू-हळू... ये ss ॥ गाई राणी ये...

- सौ. सुषमा म. खरे
०१.०१.०६

चि. इलाच्या बारश्याची निमंत्रण पत्रिका...

प्राजक्ताच्या बाहुलींच ।
आभिजीतच्या सानुलींच ॥
आजोबांच्या छकुलींच । आजींच्या नानुलींच
मावशीच्या मनीमाऊच । आत्याच्या चिऊताईच

॥ बारस आहे करायचं ॥
॥ बारस आहे करायचं ॥

अडगुळ मडगुळ सोन्याच कडगूळ
साजीर गोजीर नांव ठेवु इटुकलं ॥

सगळ्या - सगळ्यांनी यायचं हं ।
अंगाई गाऊन जोजवायचं हं ॥
बारस जेवून जाय्चं हं।
-------------------------------------------------------------
लक्ष्मीकृपा हॉल आहे पुण्यनगरी ।
७१५ सदाशिव पेठ, गाडगीळ मार्गावर ।
पुणे क्रमांक ४११०३० या पत्यावरी ॥

तेंव्हा भेटूया रविवारी
१ तारखेला सकाळी
२००६ च्या जानेवारी ॥

आता न चुकता न विसरती ।
यावे सकाळी ११.०० वाजता ॥

- सौ. सुषमा म. खरे
०१.०१.०६




Friday, October 7, 2011

उंच आकाशी उडताना.

उंच आकाशी उडताना
मारतोस तू भरारी
पंखाने कर्तॄत्वाच्या
करतोस चंद्रावर स्वारी

उंच आकाशी उडताना
जाण्याची मंगळावर आस
पराधीनता जाणवे
जेंव्हा "कल्पना" चा होतो घात... (कल्पना चावला)

उंच आकाशी उडताना
खूप उंच जाऊ वाटें
परी नको विसरूस
धरणीशी आपूले नाते.

उंच आकाशी उडताना
सर्व काही लहान भासते
थोरपण समजावयाला
खाली उतरावे लागते.

टिप: "चतुरा" ह्या एप्रिल २००४ च्या मासिकातील ओळ - "उंच आकाशी उडताना"

- सौ. सुषमा म. खरे

चि. सौ. प्राजक्ता (मनू) च्या लग्नाचा दूसरा वर्षाच्या वाढदिवस.

काटे न टोचता
सुगंध गुलाबाचा
दरवळू दे
प्रसन्नतेचा गंध
सदैव राहू दे

पुढील वर्षा साठी -
संसार तसवर तुझा
नित्य प्राजक्त बहरावा
धुंद मंद सुगंध त्याचा
आभिजीतने प्राशावा

- सौ. सुषमा म. खरे
२८.०४.२००४

Best of Luck चं ग्रिटींग

चि. अमेय हळबे यास,
अनेक उत्तम आशीर्वाद.
"यशस्वी भव"

माझा अभ्यास झाला आहे. मी परिक्षेची तयारी नीट केली आहे. असा आत्मविश्र्वास बाळगूनच परिक्षेस बस.

"God helps those who help themselves" हे पक्क ध्यानात ठेव.
तुला निश्र्चितच उत्तम यश प्राप्त होणार आहे. त्यासाठी आमच्या सर्वांच्या तुला शुभेच्छा व शुभार्शीवाद.
- खरे कुटुंबीय
------------------*---------------------------*----------------------------------------------

ग्रिटींग वरील मजकूर (मुखपृष्ट)...
"successful people don't do different things, they just do things differently"

------------------*---------------------------*----------------------------------------------

आतिल बाजू ...
"Wishing you loads of Good Luck, So as to make your efforts fruitful and you successful"

"ALL THE BEST"

- सौ. सुषमा म. खरे
२७.०२.२००४








चि. निनाद ह्याला मुंजीची भेट

चि. निनाद यास,
अनेक उत्तम आशीर्वाद,

निनाद! मुंजीचे प्रेझेंट म्हणून तुला हे पुस्तक देत आहे ते तुला खूप आवडेल असे वाटते. कारण सांगू का? तुझ्या अमिता आणि अमला मावशीने चक्क तुझे व तुझ्या मित्रांचे नांवच गोष्टीत घातली आहे. (छापून घेतले आहे). वाचून बघ बघू. झाला न आनंद. तुझ्या मित्रांनापण वाचून दाखव. ही आगळी भेट पाहून ते पण खूष होतील.

निनाद! मला मात्र असे वाटते, तू एवढे मोठ्ठे व्हावेस की तुझे नांव पुस्तकांत आले पाहिजे. म्हणजे बघ तुझा लाडका निल आर्मस्ट्रांग सारखे. आहे की नाही त्याचे नांव तुझ्या शाळेच्या पुस्तकांत. तू जयंत नारळीकर सारखा हो. आपले राष्ट्रपति अब्दुल कलाम सारखा बन. तू नेकमी "छत्रपति शिवाजी महाराज की जय" म्हणतोस, तर शिवबा सारखा होण्याचा प्रयत्न कर. तुला गोष्टी आवडतात तर गोष्टी लिही, कविता आवडतात तर कविता रच, कुसुमाग्रजां सारखा हो. तुला क्रिकेट आवडते तर सचिन सारखा खेळ. तुला जे होणे आवडेल ते तू हो. पण सर्वश्रेष्ठ हो.

एक गोष्ट लक्षांत ठेव की मोठ होण्यासाठी खूप प्रयत्न करायचे, चिकाटी ठेवायची, पण टेन्शन घ्यायचे नाही. निराशतर अजिबात व्हावयाचे नाही. त्यासाठी आपले शरीर पण धष्ट-पुष्ट असले पाहिजे. म्हणून रोज सुर्यनमस्कार घाल. जेवताना हट्ट करावयाचा नाही. सर्व नीट जेवायचे. सचिनच्या अंगात ताकद आहे म्हणून तो छान फ़टके मासतो, हो की नाही?

हे पुस्तक तू कायम जपून ठेव कारण तू खूप मोठा होणार आहेस, तुझे नांव सर्वत्र होणार आहे. हे पुस्तक म्हणजे त्याची सुरवात आहे व आमचे आशीर्वाद आहेत.

मला माहिती आहे की तू हे पत्र आईकडून वाचून घेतले आहेस. काही हरकत नाही. तू आत्ता पासून लिहण्यास सुरवात कर "मी मोठा बनण्याचा प्रयत्न करणार आहे." असे प्रॉमिस देणारे पत्र मला लिही इंग्रजीत लिहलेस तरी चालेल पण मोठा झालावर मात्र मराठीतच लिही ’हे’.

चि. सौ. वैशालीस व चि. श्री. शंदेश यांस अनेक आशिर्वाद.

तुझ्या आजी व आजोबांना नमस्कार.
तुझी मामी आजी
सुषमा.

- सौ. सुषमा म. खरे
०७.०५.२००३

संसार म्हणजे...

संसार म्हणजे एक सर्कस आहे
आईपणाचा तोल सावरताना,
बायकोपणाचा तोल जातो
बायकोपण सांभाळताना,
आईपण घसरून जाते.
मी फ़क्त एक विदूषक बनते
चेह~यावर कायम हासू राखते.
नेत्र मात्र मिटून घेते, मिटून घेते
दोन्ही अवस्थेत मात्र मी, फ़क्त प्रेमच करते... प्रेमच करते...

- सौ. सुषमा म. खरे

Thursday, October 6, 2011

एकवेळ आई होणे सोपे असते...

एकवेळ आई होणे सोपे असते
पण आईपण निभावणे, कठिण असते.

एकवेळ पत्नी होणे सोपे असते
पण नव~यातील मूल, जोजावणे कठीण असते.

एकवेळ सासू होणे सोपे असते
पण सुनेत मुलगी पाहणे, कठीण असते.

एकवेळ सासू होणे सोपे असते
पण जावयाचे मन राखणे, कठीण असते.

एकवेळ आजी होणे सोपे असते
पण दुधावरील साय, जपणे कठीण असते.

- सौ. सुषमा म. खरे


श्री. क्रुष्णाजी (किसनराव) गोपाळ छत्रे (७५ वर्ष)

कित्ता गिरवावा आचरणाचा अक्षराचा
माज सेवेच्या स्वधर्माचा
थकत काम करण्याचा
राष्ट्र कार्यार्थ समर्पणाचा
सा घेतला स्वयंसेवकाचा

त्र राहू दे सदैव तुम्हांवर ईश क्रुपेचें
त्रेसष्टा वर तीन तपे होवो जीवन सुखाचे.

- सौ. सुषमा म. खरे
१८.०३.२००३

मला माहिती आहे..

मला माहिती आहे की, मी
इंदिरा, शांता नाही होऊ शकत
म्हणून, मी कविता रचायचीच नाही का?

मला माहिती आहे की, मी
लता, आशा नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी गायचेच नाही का?

मला माहिती आहे की, मी
बिरजू, कनक (गोदी क्रुष्ण) नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी नाचायचेच नाही का?

मला महिती आहे की, मी
राजा रवी, रघुवीर नाही होऊ शकत
म्हणून, मी कधी चित्र रेखाटयचीच नाही का?

मला महिती आहे की, मी
परमोच्च शिखर नाही गाठू शकत
म्हणून, प्रयत्न कधी करयचेच नही का?

मी मात्र कविता रचनारच आहे
कारण त्यात माझा प्राण आहे.

मी मात्र गाणे गाणारच आहे
कारण त्यात माझा परमानंद आहे

मी मात्र न्रुत करणारच आहे
करण त्यात ताल व लयचा संगम आहे

मी मत्र चित्र रेखाटणारच आहे
कारण त्यात निर्मितेचे सुख आहे

मी मात्र पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारच आहे
कारण त्यात माझ्हे समाधान आहे
प्रयत्नावर माझी खूप श्रद्ध आहे
पुनर्जन्मावर माझा विश्र्वस आहे.

- सौ. सुषमा म. खरे

चतुरातर्फ़े चिवित्रा - प्रतिसाद

कसं सांगू तुला
काय वाटतं मला
सांगायचे काही तुला
म्हणुन
शब्द सर्व जुळवून घेते
पुन:पुन्हा म्हणून बघते
पण तू जवळ येताच
सर्व काही विसरून जाते

कसं सांगू तुला
काय वाटतं मला
’चतुरा’ तू सखी ग माझी
सर्वांगानी सुंदर जशी
आतुरतेने वाट पहाते
हास्य छबी तर फ़ार भावते
अंतरंगातील नाना छटा
जणू ज्ञानसागराच्या लाटा

कसं सांगू तुला, काय वाटते मला
’चतुरा’ तू तर खरच चतुर आहेस
दोन पानाचा मजकुर सहज मिळवत आहेस
तरी सुद्धा तुझी ही चतुराई
मुझे तो भोत भोत पसंत आई

टिप: चिवित्राचा भिंगारे - हिंदी - मराठी (डॉ. गिरीष ओक) - एकत्रीत भाषेत ओळी पुर्ण करण्याचे सुचवतो. अतिशय बोली भाषा मुंबई मराठी - मुंबईचे हिंदी म्हणून भोत - भोत. 'चतुरा’ मधे आलेलि ओळ - कंस सांगू तुला, काय वाटतं मला.


- सौ. सुषमा म. खरे

मध्यप्रदेश सहल - ब्राह्मण सभा ठाणे.

झुकुझुकु झुकुझुकु
महानगरी गाडी
रत्रीच्या वेळी मुंबई सोडी
ब्रा्ह्मण सभेची सहल नेऊया
मध्यप्रदेशी जाऊया जाऊया ॥

मध्यप्रदेश आहे मोठा
खराब रस्तांना नाही तोटा
बस मधे बसून बैलगाडीचा
अनुभव घेऊया ॥ मध्य...

भारतात शिल्पानां नाही तोटा
खजुराओचा मानच मोठा
तरूणाईचा अनुभव
पुन्हा घेऊया ॥

कान्हा अन बांधवगड
जंगल सफ़रीची आहे ओढ
जिवंत शिल्प पाहूया
बाघोबाची डरकाळी ऎकूया ॥

कपिलाश्रम अन नर्मदा उगम
कपिळ्धारा अन सोनुउगम
भव्यतेचे दर्शन घेऊया ॥

जबलपूर आहे तालेबार
कौसानी सिक्ल घेऊ हजार वार
साड्या नेसून मिखूया ॥

केट्र्र आहे सुगरण
रोज नविन मेनुची पखरण
माव्याची जिलबी खाऊया ॥

ब्राह्मण सभेची सहल नारी
आनंदाची हो परवणी
दरवर्षी सहलीला येऊया
ना ना ठिका्णे पाहुया ॥

- सौ. सुषमा म. खरे

३०.१२.२००२ - १२.०१.२००३

Thursday, March 10, 2011

चि. सौ. सुमेधाचे डोहाळे जेवण २००२

टिप: चाल - शालू हिरवा पाचूनी मरवा, वेणी तिपेडी घाला.

कैरी आवळा चिंच न बोर
तुम्हीच मजला आणा
साजण राजा येणार बाळच माझा
इवला सोनुला स्वप्नी आला
खुदुखुदूनी हसला ॥ सानण राजा... ॥

पावभाजी पाणिपुरी
उपमा मजला प्यारा
बदाम काजू मनुकांचा ही
खुराग मजला न्यारा
चाँकलेट, आंबा आईस्किम साठी
व्याकुळ जीव हा झाला ॥ साजण राजा... ॥

भू-भू माऊ अशी खेळणी
नकोच माझ्या बाळाला
रोबो अन काँप्युटर
हवाच त्याच्या दिमतीला
सिडी, फ्लाँपी, चॅटींग, सरफिंग
ह्या शब्दांची माळा
घालाच माझ्या चिमुकल्या राजाला ॥ साजण राजा...॥


- सौ. सुषमा मधुकर खरे.

१७.३.२००१ - निवृती अलाहाबाद बॅंक

सिम आनंदाचे वेचले मी कण
लाभले मला स्वावलंबनाचे क्षण
हात मैत्रीचे, माझे सुखावले मन
बाकी राहीले मग आठवणिम्चे धन
ररोज स्मरेल हे कृतार्थ जीवन


बॅंकेत करत होते मी अंकांवे मेळ
रू का आता मी शब्दांचे खेळ?


पुलकी अन जिव्हाळा, इथे मला लाभला
रमेश्र्वर रुपी ग्राहक, इथे मला पावला
लीलया दिन तपाचा, इथे काळ सरला
क्रवाढीने सुखाचा, इथे ठेवा गावला


बॅंकेतील सहजीवनाचा, आनंद मला भावला
ळकळीची आता विनंती, असाच लोभ असावा.



- सौ. सुषमा मधुकर खरे.

भारत भू - अटल बिहारी ह्यांच्या करीता लिहिलेली कविता

भारत भू मधे कधीही
नाही ____ संतांची
वंदनीय ___, पांडूरंग
बहूत असती संत महंत
गरज आहे रामदासांची
कोट्यावधी शिष्यगणांची
गरज आहे सांगण्याची
तुमच्या हाती शक्ती आहे
रामराज्या बनवण्याची
रामराज्या बनवण्याची ॥

स्वदेश रक्षणाकरीता
नाही गरज यज्ञयागाची
गरज आहे आत्याधुनीक
शस्त्र अस्त्र असण्याची
शस्त्र अस्त्र असण्याची ॥

देश समृध्द करण्यासाठी
नाही गरज विदेशाची
गरज आहे सर्व्जनांनी
स्वदेश प्रेम बाळगण्याची
स्वदेश प्रेम बाळगण्याची ॥

गरज आहे श्रीकृष्णाची
जनतार्जुनाला सांगण्याची
मतदानाचा हक्क बजावून
सुयोग्य व्यक्ती निवडण्याची
सुयोग्य व्यक्ती निवडण्याची ॥

गरज आहे दिशासाठी
स्थिर सरकार असण्याची
अटळ सुराज्यासाठी
अटल पंतप्रधान होण्याची ॥


- सौ. सुषमा मधुकर खरे.

संगणक

संगणका तुला मनच नसते
हेच फार चांगले असते

मनाने हळवा तू कधी होत नाहीस
मनात तांडे तर तू कधी खात नाहीस
अपमानाचे सल तुला खूपत नाहीत


- सौ. सुषमा मधुकर खरे.

माझ्या मनावी पाटी

माझ्या मनाची पाटी
कधीच नसते कोरी
शब्दांच्या सोंगट्याने
मी सारीपाट मांडते
कधीकधी जिंकते
तर कधीतरी हारते ॥

कधी कधी वैशाख
वणवाच चितारते
तर कधी वसंत
वैभवच रंगविते
श्रावण सरींचे
तर गाणेच लिहते ॥

सुरांचे मधुर स्वर
त्यावर मी कोरते
शब्द - सुरांची तर
मी रांगोळीच रेखते
त्यातच हरखून
मी हरवून जाते ॥

तरी माझ्या मनाची पाटी
कधीच नसते कोरी ॥


- सौ. सुषमा मधुकर खरे.

श्री. भाईवाल (ज. मॅनेजर) यांचे कलितेच पुस्तक वाचल्यावर

मनांच्या श्र्लोकात
धडे दिले नीतिचे
मनांच्या ह्या गीतात
धागे गुंफले भावनांचे



- सौ. सुषमा मधुकर खरे.

श्री. पंढरीनाथ (छोटू) दांडेकर यांनी लिहलेल्या वात्रटटिका वाचल्यावर

वात्रट वात्रटिकेला
मंगेश पावला
छोटू तर झूल्याच्या
दांड्यावर बसला


झुलतो झूला
जाई आभाळा
पंढरीनाथ करी
उर्मीलेच्या (पत्नी) धावा


- सौ. सुषमा मधुकर खरे.

कधी काळी

कधी काळी म्हणे मी गाणे गात होते.
आता मात्र कामाचे रडगाणे गाते ॥

कधी काळी म्हणे मी कविता करत होते
आता मात्र मी डेबिट, क्रेडितच करते ॥

कधी काळी म्हणे मी शब्द फुलवत होते
नाना शब्दांसवे मी गोफ गुंफत होते ॥

आता मात्र शब्द सारे रुसून निघून गेले
शब्द खात्यात माझ्या फक्त डेबीतच उरले ॥

आता मात्र असे वाटते शब्द फिरून परत येतील
हरवलेले माझे शब्द आता मला सापडतील ॥

शब्द खात्यात माझ्या किंचीत क्रेडित सुरु होईल
शब्द माझ्या संगे लपंडाव खेळतील ॥

बँकेत साधत होते मी अंकांशी मेळ
आता मात्र करीन मी शब्दांशी खेळ ॥

खेळामधे शब्दांना मी बरोबर पकडीन
मग शब्द खात्यात माझ्या क्रेडीत सुरू होईल ॥

आता व्ही.आर.एस. घेतल्यावर आशा मी करत आहे
रुसलेल्या शब्दांचा राग मी काढणार आहे ॥

मग डेबीत खात्यात माझा किंचीत क्रेडीत सुरु होणार आहे
मग डेबीत खात्यात माझा किंचीत क्रेडीत सुरु होणार आहे ॥


सप्टेंबर १९९२

टिप : आईने १९७८ पर्यंत लिहिलेल्या कविता मी खाली लिहिल्या. मात्र नंतरच्या काळात बँकेतील नोकरी, लग्न, मुली, मुलिंचे संगोपन ह्यात आईचे शब्द कोठेतरी हरवले होते. ते शब्द जसे काही मैत्रेयीच्या कवी संमेलनात श्रोता म्हणून गेल्यावर आईला परत सापडले. आईने परत एकदा शब्दांशी खेळायला सुरवात केली आणि हीनागपूरला ट्रेनीगसाठी बँके तर्फे गेली असताना ची तिच्या परतिची पहिली कविता .

- सौ. सुषमा मधुकर खरे.

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कविता!

क्षणभर आलास तरी चालेल
पण मुसळधार पावसा सारखा ये
माझ्या जीवनात
प्रेमाने चींब भिजवायला ॥

क्षणभर आलास तरी चालेल
पण वादळ वाऱ्यासारखा ये
माझ्या जीवनात
चैतन्य बी पेरायला ॥

क्षणभर आलास तरी चालेल
पण चमकणाऱ्या विजेसारखा ये
माझ्या जीवनात
जीवन उजळून टाकायला


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
१९७०-१९७८

मुंबईत सागराने जेंव्हा झोपडपट्टी उध्वस्त केती.

सागरा तू ही नाहीस ना
गरीबांचा वाली
दाही दिश्या भटकतात
वीतभर भरण्यासाठी
पोवची खळगी
गुरासारखे राबतात
निदान एक वेळची
अर्धिभूक भागविण्यासाठी

आले होते ते बिचारे
तुझ्या असण्याला
निदान तू तरी तुझ्या
थंड पाण्याच्या शिडकावाने
शिण घालवशील म्हणून
पुन्हा काबाड कष्ट करण्यास
नवे जीवन देशील म्हणून

पण तू ! तू निघालास
उलट्या लाळजाचा, उन्मत्त !
तू ही गरीबांना हतविलेस
घाम गाळून साठविलेले
किडूक मिडूक
ते ही तू गिळून टाकलेस
तुला नाही दिसल्या उत्तुंग इमारती
काळ्या पैश्याचा दिमाख दाखविणाऱ्या
-
-
-
सागरा तूही शेवटी
खारटच निघालास रे सागरा !


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
१९७० - १९७८ च्या सुमारास

मैत्रिण (सौ. सुलभा) ह्यास लिहिलेली कविता

वेल बहरली ग
वेल बहरली
पुष्पाच्या चाहूलीने
मोहरुन गेली ॥

इवला नाजूक सोनुला
मोगरा ग फुलणार
पाने पाने हलवून
वेल त्यास जोजाविणार



- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कवितां पेकी एक

मी कशी आहे, मी कशी आहे
जशी आहे तशीच, तशीच राहणार आहे ॥

अशी नको म्हणून असणार आहे
अशी हवी म्हणून नसणार आहे
जशीच्या तशीच राहणार आहे
न बदलणारी, न बदलणारी ॥

निराशा पदरी पडली तरी
आशेने वाट पाहणार आहे
नको नको म्हणतानाच
माझे मन गुंतणार आहे ॥

वेड्या सारखी स्वत:ला
अशीच हरवणार आहे
खुळ्यासारखी मी माझे
मी पण विसरणार आहे ॥


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).

शर्मिली

हाती गुंफुनीया हात
जात होते ते मजेत
मेघ आले हे दाटून
गेला तो आनंदून ॥

ती मात्र गोंधळली
पुरी पुरी बावरली
उभी दोघ झाडाखाली
चिंब चिंब भिजलेली ॥

ती लाजली लाजली
मनातून हरवली
मान झुकवून खाली
हळूच त्यास न्याहाळी ॥

ओलेते सौंदर्य तिचे
प्राशनात तो गुंतला
गालावरील लाली
टिपण्यास आधिरला ॥

जाणून ती आधिरता
कडाडली विद्दुलता
दचकून ती आलंगली
घाबऱ्या पाडसापरी ॥

खट्याळपणा विजेचा
आला जेंव्हा ध्यानी तिच्या
पुरी पुरी सामावलेली
होती मिठीत ती शर्मिली ॥


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
१२ जुलै १९७३

गुळसुंदला जाताना

एका हिरव्या मळ्यावर
वृक्ष एक सुकलेला
बिचारा ॥

सभोताली सर्व त्याच्या
तारूण्याने मुसमुसलेले
धुंदफुंद ॥

बागडणारे, हरखणारे
वाऱ्यासंगे डोलणारे
प्रेमांध ॥

आणितो, तो मात्र एकला
पिकलेला वठलेला
अनासक्त ॥

जीवन जहर पचविलेला
करपलेला, थकलेला
एक वृध्द ॥

जणू काही सूचविणारा
अमाप दु:ख, मर्त्य तारुण्य
नाशवंत ॥


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
६ एप्रिल १९७२

इंदीरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली

१९७० - १९७८ च्या काळात आईने लिहिलेल्या काही कविता.

(देहाची तिजोरी, भक्तिचाच ठेवा ह्या चालीवर )

मंत्र्यांची तिजिरी पैशाचाच ठेवा
उघड डोळे जनता आता उघड डोळे जनता ॥ धृ ॥

उजेडात सत्यवान अंधारात कब्जीराव
त्यांचे हाती आहे बाबा पैसेवाले राव
गोरगरीबांची मते पैशाने फोडावी ॥ १ ॥

स्वार्थ जणू अंतर्यामी पूर्ण भिनलेला
गरीबी हटाबोचा घोष उगा धरलेला
संबधीत अपराधांचा गुन्हा सावरावा ॥ २ ॥

तुझ्या हाती पांडूरंग देशाचेच हित
स्वार्थी नेत्यांपासून कर मतदारांना मुक्त
योग्यमार्ग सकला आता तूच दाखवावा ॥ ३ ॥

टिप : इंदीरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली व निवडणूकी साठी म्हणून गरीबी हटाओचा नारा त्या काळी दिला होता.

- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
मार्च १९७१

संक्रांतीचे शुभेच्छा

१९७० - १९७८ च्या काळात आईने लिहिलेल्या काही कविता.

आईची मैत्रीण (सुलभा दीक्षीत व सौ. अनिता खाडिलकर) ह्यांच्या साठी संक्रांतीचे शुभेच्छा कार्ड.

संक्रांत तुझी ग पहिली
थाटात साजरी होऊदे
माझी शुभेच्छा ग तुला
संसार सुखाचा होऊदे ॥

तिळाची स्निग्धता
गुळाची ग गोडी
राहूदे कायम ग
तुझा संसारी

_________________ *____________________ * ____________________

संसार बकुळावर तुझ्या
वसंत सदैव डोलावा
सुलभ सुगंध ग त्याचा
नित्य, अनिलने प्राशावा

- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कविता.

१९७० - १९७८ च्या काळात आईने लिहिलेल्या काही कविता.

दर्पण बघूनी, सुस्वरूप आपुले
काय गे मनी तरंग उठले?
खुदकन तुझी का गे कळी फुलली?
गुपीत गोष्ट का तुज स्मरली?

रोखूनी नयने काय पाहसी?
मृगाक्षी कुणी म्हंटले स्मरशी
गालावर का चढमी लाली
गोड फसवणूक तुज आठवली

ओठात तुझ्या ग कोणते गीत?
मधुर मीलनाचे का हे संगीत
पदर सावरूनी का गे उठली
चाहूल का कुणाची लागली

- चि. सुषमा गणेश पाटण्कर (सौ. सुषमा मधुकर खरे)
नोव्हेंबर १९७०

२६ जानेवारी

आईने बालपणी रेडिओ, गंमत - जंमत साठी लिहिलेली आजून एक कविता.

आम्ही सण जरी मोठे
तरी तुझे श्रेष्ठत्व मोठे
हे २६ जानेवारी ॥ धृ ॥


गोकुळ अष्टमी सण वदला
मी फक्त हिंदू लोकांचा झाला
मज दिवशी हंडी फोडती
सर्व जणांचा राजा मानीती
पणं ! सर्व धर्मीय तुला मानती

जन, उत्साहाने तुजला वन्द्ती
म्हणून, मी तुला प्रणाम करतो
हे २६ जानेवारी ॥ १ ॥
वदतसे, दसरा सण त्याला
मी लोकांच्या आवडता असला
सायंकाळी सोने लुटुनी
जन आनंदूनी जातात
पण तुज दिवशी - ध्वजारोकण करूनी
जन आनंदाने प्रणाम करतात
म्हणून, मी तुजला प्रणाम करतो
हे २६ जानेवारी ॥ २ ॥

वदतसे दिवाळी सण त्याला
मी बालकाची आवडती असली
मज दिवशी पणत्या लावती
धडाड्धूम फटाके वाजवीती

पण प्रजासत्ताक दिनी दिव्यांची रोषणाई करती
जन आनंदाने मोहून जाती
म्हणून तुजला प्रणाम करतो
हे २६ जानेवारी ॥ ३ ॥

गणेश उत्सव वदतसे त्याला
माझा प्रांतीय उत्सव झाला
मज दिवशी स्पर्धा ठेविती
आनंदाने मजला पुजीती

पण, तुझा राष्ट्रीय उत्सव मानीती
तुला सर्व लोक प्रणाम करती
म्हणून मी तुजला प्रणाम करती
हे २६ जानेवारी ॥ ४ ॥

वदतसे २६ जानेवारी बाळांना
काहीतरी चांगले असतेच प्रत्येजणात
म्हणून माझा स्तुती करू नका
मी सांगते ते कान देऊन ऎका

भांडू नका, तंटू नका
गर्विष्ट कधी बनू नका
खोटे कधी बोलू नका
शांती भंग करू नका
एवढे मन वहित टिपण्यार
विसरू नका, विसरू नका ॥ ५ ॥

- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे)

भोंडल्याचे गाणे

आईने बालपणी लिहिलेली आजून एक कविता.


या मुलींनो, या मुलींनो आमुच्या घरी या या या याया, या या या या लवकर या ॥ धृ ॥


आपण साऱ्या, साऱ्या जणी भोंडला खेळूया या
पाटावर हत्ती काढून फेर धरूया, गाणी गाऊ या
हेमा, निना, सुलभा. शैला साऱ्या जणीया
छान छान नव नवीन खाऊ घेऊन या
साऱ्या जणी मिळून तो खाऊ ओळखू या
ओळख ला, नाही ओळखला तरी
सगळा खाऊ आपण मट्म करूया


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे)

वीर कलीका

मुलगी - कलीके तू आशी पानांच्या आड का द्डून बसशी?
मी येता येता वासच आला बाई
मी चौहूबाजूला पाहिले तरी तू दिसलीच नाही ॥ १ ॥

तुला थंडी वाजते का?
तुला थंडी वाजते का?
आम्ही तोडू असे वाटते का? ॥ २ ॥

कलिका - मला वाटते मुलींच्या वेणी जाऊनये
मला वाटते भक्तांनी मज तोडू नये
मला वाटते देवांच्या पदी पडू नये
मला वाटते उगाच कुणी मज लुटू नये ॥ ३ ॥

मला वाटते जवाना बरोबर जावे
मला वाटते त्याजला वरावे
मला वाटते वीरपूजक व्हावे
मला वाटते जो रणांगणी पडेल
त्याज बरोबर सती जावे
नी जिवन सार्थक करावे ॥ ४ ॥

- चि. सुषमा गणेश पातणकर (सौ. सुषमा मधुकर खरे)

टिप : चीन, पाकिस्तानशी लढाई झाली त्यानंतर लोकलेले आहे.
रेडिओ गंमत - जंमत मध्ये १९६० -१९६१, १ ऑगष्ट

आम्ही सवाई टिळक होणार हो
आम्ही सवाई टिळक होणार हो ॥ धृ ॥

टिलकांनी रचीला स्व्राज्याचा पाया
गांधींनी रचीले सुंदर मंदिर
नेहरूंनी उबारिला त्यावर झेंडा ॥ १ ॥

टिळक नाही म्ह्णूनी सारे
रडत बसती म्हातारे - कोतारे
बाळ आम्ही ’बाळ’ दिसत नाही
म्हणून रडणार का हो ॥ २ ॥

टिळक होते केवळ केसरी
आणण होऊ नर केसरी
नरा सारखे करू या काम
विकास योजना करू या काम
सिंह गर्ज्ना करूनिया
पाक चिन्यांना पळवू या ॥ ३ ॥

- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे)

टिप: मा. माया ताई (चिटणीस) त्यावर म्हणाल्या की टिळक तर होऊन दाखवा, मग सवाई टिळक. आता पटले की टिळक होणे अशक्यच आहे.


१९६० - रेडिओवर गंमत - जंमत मध्ये साजर केलेली कवीता. आई १० वर्षाची असताना तिने केलेली कविता.

मुलगी - आई ग आई (आई ग आई)
आई - काय ग बाई ॥ धृ॥

मुलगी - रेडिओ मध्ये कोण ग गाई
आई - रेडिओ मध्ये माणूस गाई ॥१॥

मुलगी - माणूस? माणूस कसा मावेल ग आई?
आई - त्यामध्ये बाहुली आहे ग बाई ॥२॥

मुलगी - बाहुली? बाहुली कशी लोलते ग आई?
आई - बाहुली आहे मजेदार बाई ॥३॥

मुलगी - माझी बाहुली बोलत का नाही?
आई - तुझी बाहुली मजेदार नाही ॥४॥

मुलगी - मजेदार बाहुली हवी ग आई
आई - बाबा आले की सांग बाई ॥५॥

- चि. सुषमा गणेश पाटणकर. (सौ. सुषमा मधुकर खरे)


टीप: T.V व computer च्या युगात ही कविता म्हणजे वेडगळच वाटेल. पण त्या काळी आमच्या कडे रेडिओ पण नव्हता. शेजारच्या रेडिओवर गाणी ऎकू यायची. खुपच अप्रुफ वाटे. (३/३/२००२/)

अथश्री...

श्रीगणेशदत्तगुरूभ्यो नमः
श्रीनानामहाराजाय नम:

मी साधारण १०/११ वर्षाची असताना कविता करण्यास सुरवात केली. मी पहिली कविता"’रेडिओ " वर केली होती. ती मी "गम्मत जम्मत" ह्या आकाशवाणी कार्यक्रमात वाचली. साल होते १९६०/१९६१. त्यावेळेला जश्या लिहल्या तश्याच आता संगणकात उतरवत आहे.त्या सर्व कविता सुषमा गणेश पाटणकर ह्या नावाने लिहल्या होत्या.२०/२५ वर्षाच्या खंडा नंतर अलिकडॆ काही कविता डायरीत लिहल्या.त्या पण उतरवत आहे.

प्रथम श्री गणॆश वंदना म्हणून १ ली कविता गजाननाची संगणात लिहते.

- चि. सुषमा गणेश पाटणकर. (सौ. सुषमा मधुकर खरे)